आज ना माझी भाची माझ्याकडे रहायला आली आहे… तिच्याशी आज पोटभर गप्पा मारल्या.. एवढी मजा आली म्हणून सांगू…एकदम तिच्याएवढेच झाल्यासारखे वाटायला लागलेय मला…
कशी मजा असते ना.. आपल्याकडे जे असते ना ते सोडून दुसरेच काही हवे असते आपल्याला कायम.. लहानपणी मोठे व्हायची घाई.. आणि मोठे झालो की का बरे झालो मोठे म्हणून चेहरयावर एक आठी..
आज तिच्यानिमित्ताने मला लहान झाल्यासारखे वाटायला लागलेय.. असं वाटतयं खरचं पुन्हा लहान होता आलं तरं.. शाळेतला निबंधाचा विषय वाटतोय नाही….
माझी अवस्था आज एक भलं मोठं आणि विस्कटलेलं कपाट आवरणार्या मुलीसारखी झालीय…कपाट आवरता–आवरता हाती येणार्या प्रत्येक वस्तूच्या आठवणींमध्ये हरवता–हरवता नक्की काय आवरतोय हेच कळू नये असे काहीसे झालेय.. आज तर मी नुसती लॅपटॉप कढून लिहायला सरसावलेय.. विषय ठरवला नाही की मजकूर.. फक्त लिहित जायचे अगदी फुलपाखरी मनाने एवढेच काय ते ठरवलेय…
असं होतं ना कधी कधी .. वाटतं की.. एखादा क्षण मुठीत बंद करून ठेवावा अगदी अलगद.. आणि मग हळूच मूठ उघडून ते क्षण पुन्हा एकवार जगावेत ..स्वैर सोडावे मनाला आणि भटकू द्यावे त्याला , त्याला आवडलेल्या स्मृतींमध्ये.. जसे हवे तसे.. हवे तिथे… ठरलं तर मग आजचा दिवस दिली सुट्टी मनाला भटकू दे त्याला हवे तेवढे.. बघू तरी जाते कुठे कुठे ते..
पण त्याला नाही हां कळू द्यायचे…
काय मस्त वाटतयं इथे… कुठे आहोत माहितेय आपण आमच्या तळमावल्याच्या घरात.. हे भले मोठ्ठे घर होते ते…
दिवसभर नुसते बागडतं असायचे मी इथे.. आणि आत्ता काय बरं करतेय मी… अच्छा .. या खिड्क्यांना धरून बाबांबरोबर बाहेर बघण्यात रममाण दिसतेय… काय मज्जा यायची माहितेय.. बाहेर भले थोरले अंगण .. नानाविध फुलांनी फुललेली बाग.. आणि सोबत बाबांच्या गोष्टी.. जेमतेम वर्ष–दिड वर्षाची दिसतेय मी.. अरेच्चा हे काय.. बाबांना पेशंटनी हाक मारलेली दिसतेय.. ते नुसते मागे वळले आणि आणि हा काय प्रताप माझा..मी डायरेक्ट खिडकीतून खाली उडी… अरे देवा.. असे झाले होते तर…झाले.. आई–बाबांची भलतीच भंबेरी उडवली की हो मी.. मग काय पुढचे दोन महिने.. अस्मादिक प्लॅस्टरचा पाय घेऊन शकूनीमामा झालेलो दिसतोय.. काय पण नसता उद्योगीपणा म्हणायचा हा….. पण काय लाड करू घेतले मी अहाहा.. कायम कडेवर…आणि म्हणालं तो खाऊ..
मजा आहे बुवा… अरे पण हे काय आता कुठे तरी वेगळीकडेच आलेलो दिसतोय आपण… हे ना माझ्या काकूचे घर ..सातार्याचे.. मला ना फार फार आवडायचे हे घरं.. तो लाकडी गोल गोल जिना.. माझा आख्खी दुपार मुक्काम तिथेच असायचा.. आताही तिथेच सापडेन बहुतेक.. काय म्हटलेलं मी तुम्हाला.. पण हा काय अवतार.. डोक्याला भला मोठा टॉवेल गुंडाळून वेणीसारखा टॉवेलचा शेपटा तर झोकात रुळतोय.. आणि हातात पट्टी घेऊन शाळा घेणे चाललेय इथे.. आणि शाळेत विद्यार्थी एकच.. माझे भाऊ आजोबा..
“काय हे साधा २ चा पाढा येत नाही तुम्हाला ?? कसे काय होणार तुमचे मोठेपणी ? ” चांगली खरडपट्टी काढणे चालू आहे की मास्तरीण बाईंचं. “सॉरी सॉरी” विद्यार्थी आता गयावया करण्याच्या मूडमधे.. “काही नाही जा आधी पालकांची चिठ्ठी घेऊन या”.. “अहो, माझे आई-बाबा इथे नसतात .. मी काका काकूंकडे रहातो.. ” आजोबा माझीच नक्कल करतायत की काय… तेवढ्यात मास्तरीण बाईंचे उत्तर.. “ठीक आहे.. मग स्थानिक पालकांची आणा सही.. ” आता मात्र विद्यार्थी आणि हे सगळॆ आठवणारी मी हसून हसून लोटपोट.. स्थानिक पालक.. ??? कुठून कळला होता हा शब्द मला… आणि कसला नेमका वापरला मी… 🙂 🙂
असेच फिरत रहावे वाटतेय.. कुठे कुठे जाता येईल याचे चक्र सुरू झालेय.. वेग चांगलाच आलाय.. पण हे काय पुन्हा रेंगाळलेली दिसतेय मी.. आता कुठे???
अरेच्चा.. ही तर माझी खूप खूप लाडकी शाळा.. कराडची… इतके सुंदर दिवस होते ते.. सर्वात सुंदर… खरचं फुलपाखरी..
आता एक एकदम धाडसी विधान..तय्य्यार???
मला ना अभ्यास करायला ना खूप खूप आवडायचे.. .अगदी मनापासून आवडायचे.. त्यामुळे शाळाही आवडायची..
अर्थात शाळेत अभ्यास सोडून दंगाही चिक्कार केला.. थांबा थांबा… मी शाळेत नुसतीच भटकतेय.. आता तुम्हाला ही घेऊन चलते..
हे ना आमचे ग्राऊंड.. काय खेळायचो.. दिसले का मी.. तिथे हो.. ते खो-खोचे सामने चाललेत ना तिथे.. ते काय बहुतेक डाव दिसतोय आमचा.. आणि केवढा गलका अर्थात हवाहवासा.. पक्कड पक्कड खिच के पक्कड… हा हा हा.. ब्रिदवाक्य जणू…
थांबा जरा पुढे जाऊ.. इथे ना आमच्या वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या ..त्या तर माझ्या जीव की प्राण..
आणि इथे गॅदरिंग.. आणि हा आमचा वर्ग.. आणि या माझ्या अतिशय प्रिय बोधे बाई.. मराठी शिकवतायत आत्ता… इथून बाहेर पडूच नये वाटतेय..
मला ना वाटायचे कायम.. की इथेच शिकवावे मोठे झाले की.. काही स्वप्न स्वप्नच रहातात ना पण….
वा वा.. काय सुंदर प्रवास होता… एकदम फ़्रेश झाले मी … खरचं असा फेर-फटका मारला पहिजे सारखा-सारखा.. आपण आपले धावत असतोच की रोज.. नवीन अनुभव गाठीशी बांधत.. पण हे असे क्षण एक सुरेल उत्तर देतात आपल्या प्रश्नांना.. का पुढे जायचे ..का जमवायचे अनुभव तर या अशा सुंदर क्षणांच्या संचितासाठी….
ता.क.. बरेच दिवस ब्लॉग वरून गैरहजर होते मी.. बरेच लेख नुसतेच लिहले आणि पोस्ट नाही केले.. केवळ आळस….
त्यामुळे आधीच लिहिलेला हा लेख आज पोस्ट करतेय..
आणि एक.. हा ब्लॉग जिच्या मुळे लिहिला गेला.. त्या माझ्या लाडक्या तानियाला खूप खूप थॅंक्यू… 🙂 🙂
Opmerkingen