top of page
  • Writer's pictureMadhura

शोधा म्हणजे सापडेल !!

काल मी एक सिनेमा पाहिला.. RunAway Bride.. खरं तरं तुमच्या पैकी बर्‍याच जणांनी तो केव्हाच पाहिला असेल.. कारण सिनेमा येऊन तब्बल एक तप उलटून गेलयं.. पण नेहमीप्रमाणे मी अस्मादिकांना त्याची महती उशीरा कळली… असो..

अहाहा.. काय सुंदर आहे पिक्चर.. अप्रतिम.. ज्युलिया रॉबर्टनी इतकं सुरेख काम केलयं… असो.. त्यावर एक नवीन पोस्ट होईल..

हा सिनेमा पहाताना ना..सारखा एक विचार मनात येत होता.. काय बरं कारण असेल हिचं असं लग्नाच्या वेदीवरून पळून जाण्याचं.. न आवडलेला नवरा..(पण हे एकदा होईल दोनदा होईल.. पण इतके सारखे सारखे.. ) , काही पुर्वेतिहास.. की लग्नाची भीती… कथा साधीच असून उत्सुकता मात्र जबरदस्त लागून रहिली होती.. ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लावणारा आपला हिरो तिच्या सर्व माजी होवू घातलेल्या नवर्‍यांना तिला अंडी कशा प्रकारे खायला आवडतात हे विचारत असतो.. ती उत्तरे प्रत्येक जण वेगवेगळे देत असतात ..या उत्तरांमध्ये एक मजेशीर बाब ही असते की.. जो तो सांगतो तिला ना मला आवडतात तशीच सेम टू सेम अंडी खायला आवडतात.. आणि इकडे आपल्या हिरोच्या डोक्यात ट्युब पेटते… की तिला बिचारीला स्वतःचे मतच नसते.. प्रेमात पडताच ती त्याला जसे आवडते तसे वागू लागते.. तिला तेच सगळे आवडू लागते जे त्याला आवडते.. पण हे कृत्रिम वागणे ती कोठवर निभावणारं..

हे सगळे पाहून ना माझे विचारचक्र ज्या वेगाने धावायला लागले त्याला अगदी जसेच्या तसे इथे उतरवतेय आज…

किती छोटीशी गोष्ट.. मला स्वतःलाच काय खायला आवडते एवढेही माहित नसणे .. तसे बघायला गेले तर अगदीच सामान्य गोष्ट.. कारण असे बरेच जण आपल्या आजूबाजूला दिसतील आपल्याला… लांब कशाला जा.. अगदी स्वतःतच डोकावून पाहू ना.. आपल्याच बद्दल कित्तीतरी गोष्टी माहित नसतात आपल्याला… तसं पहायाला गेलं तर अगदी नेहमी ऐकतो आपण की या जगात आपले आपणच असतो आपले खरे सोबती..

पण मला ना नेहमी प्रश्न पडतो खरचं असतो का आपण स्वतःचे एक सच्चे सोबती.. ओळखतो का आपण स्वतःला पूर्णपणे?? कदाचित काहींसाठी हे उत्तर हो असेल ही.. पण बहुतांश लोकांचे उत्तर नाही असेल.. हो ना??? असे होते ना कधी कधी… कधी कधी का बर्‍याचदा.. कोणीतरी विचारते .. काय ग कसला ड्रेस आणू तुला वाढदिवसाला.. आपलं सोज्वळ उत्तर “अगं आणं तुला आवडेल तो..मला आवडेल तू आणलेले.. ” कधी आणखीही प्रश्न.. “आज अगदी तुझ्या आवडीची भाजी करू..सांग कुठली करू.. ” मला ना कुठलीही चालते.. माझे नखरे नाहीत ग बाई काही.. किती गुणी बाळ.. पण हळूहळू या कौतुकामुळे आपले मत न बनवणेच कसे चांगले असे वाटायला लागतात.,.. आणि मग मोठ्या प्रश्नांना बगल कशी द्यायची याचे ट्रेनिंग सुरू होते आपल्या मनाला आपल्याकडूनच.. हळूहळू आपण कसे आहोत याच्या पेक्षा आपण कसे असलेले समोरच्याला आवडेल तसे वागायला सुरुवात होते.. कुठे तरी स्वतःला हरवत जातोय आपण याची जाणीवच होत नाही.. नुसता मनाचा गोंधळ सुरू होतो मग.. कुठलाही निर्णय नकोच की घ्यायला असे काहीसे वाटू लागते..

माझी ना एक मैत्रिण आहे.. खूप हुशार अगदी ब्रिलियंट कॅटॅगरीत बसणारी.. नुकतेच तिचे लग्न झाले.. मी तिच्या घरी गेलेले एकदा.. तर मला विश्वास बसेना असं तिचं काहिसं वागणं..अतिशय बावळट भाव चेहर्‍यावर आणि भिरभिरी नजर.. सहज तिला म्हटले अग काय ग अशी का तू.. त्यावरचे तिचे उत्तर खरचं मला अचंबित करून गेले.. “अगं उगाच मी फार हुशार आहे हे कशाला दाखवा..त्यांना नाही आवडत आपलं सामान्य असलेलचं बरं .. ”

ही मुलगी तिचे सगळे व्यक्तिमत्त्व बदलायला निघाली होती…. का करतो आपण असे.. मान्य की समोरच्याला छान वाटेल असे वागावे.. अगदी मान्य… पण म्हणून स्वतःतील स्वतःला संपवून??? स्वतःची ओळख आपण स्वतःपासूनच हिरावून घेतोय आपण.. मग आपण होतो तरी कसे हेच कळेनासे होते..

असं कधी होतं का हो तुमचं?? कधी कधी ना आरश्यासमोर उभे राहून स्वतःकडेच टक लवून पहाताना एकदम अनोळखी वाटायला लागते.. एखाद्या गर्तेत असल्यासारखे.. काही तरी शोधतायत आपले डोळे असे वाटायला लागते.. पण काय तेच कळतं नाही.. काही तरी हवे असते पण आपल्याला काय हवे आहे हेच कळतं नाही.. काही तरी शोधत असतो.. काय ते माहित नाही .. कशासाठी ते ही माहित नाही.. कसलीशी जळमटं जाणवतात मनावर.. मळभ आल्यासारखे वाटते एकूणच रोजच्या जगण्यावर.. खरं तरं.. सगळं चांगलं तर चाललेल असतं.. शिक्षण,नोकरी,संसार..सगळं सगळं लौकिकार्थाने उत्तम तरीही कसलासा शोध घेत असते मन.. शुन्यातच..

पण या शुन्यातूनच सापडेल काही तरी नक्की हा दुर्दम्य आशावाद पाहिजे मनात.. मग कदाचित या चाचपडणार्‍या मनाला हाती काही तरी लागेल.. पण त्यासाठी आधी आपल्याला काहीतरी शोधायचे आहे हे तरी जाणवले पाहिजे.. मग हे काहीतरी म्हणजे काय हे हळूहळू ध्यानी येईलही आपल्या.. आणि एकदा ते काहीतरी आहे तरी काय हे कळले की सारा रस्ताच मोकळा होईल की हो..मग फ़क्त प्रयत्न अथक प्रयत्न.. ते साध्य करण्याचे..

2 views0 comments

Recent Posts

See All

खिडकी

प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, जिथे काय जादू असते माहित नाही पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी मनासारख्या जुळून येतात. आमच्या अपार्टमेंट मध्ये अशीच एक माझी आव

निरगाठ..

एक एक धागा नकळत उलगडत जातोय…ईकडून तिकडे.. एक एक वीण जुळवण्यासाठी.. कधी प्रवाहाबरोबर..कधी प्रवाहाविरुद्ध.. कधी त्याच्यासारख्या इतर धाग्यांच्या बरोबरीने..तर कधी त्यांना छेदत..गुंफण घालत..गिरकी घेत..कधी

コメント


bottom of page