top of page
  • Writer's pictureMadhura

मनाची दिवाळी…

बघता बघता दिवाळी आली…


.. सगळ्या घराघरांतून फराळाची मस्त तयारी सुरू झाली असेल नाही.. काय सुंदर सुंदर वास ऊठतं असतील.. चकली,चिवडा, लाडू.. अहा रेसगळं कसं नजरेसमोर तरळतयं माझ्याकेवढा उत्साह, एक वेगळचं चैतन्य.. रविवारी वसुबारस.. घरोघरी आकाशकंदील लागतील, पणत्यांनी उजळून जातील अंगणं..उटण्याचा तो खरखरीत पण तरी हवाहवासा वाटणारा स्पर्श, आईनी चोळूनमोळून घातलेली अंघोळ, नवीन कपडे, मग भल्या मोठ्या ताटातून एकत्र केलेला फराळ, गप्पांचे महापूर, फटाके..अरे लै भारीनुसतं आठवूनचं कसलं छान वाटतयंफार भारी….

आपल्याकडचे हे सगळे सणवार मला का आवडतात माहितेय?तर या सगळ्यामधील सर्वात भावणारां घटक काय वाटतो तर, उत्साह, अवर्णनीय उत्साहसगळ्या वातावरणातच एक सळसळता उत्साह असतो.. आणि तोच जास्त भावतो मला.. नाहीतर कित्येकदा आपण तेच तेच दैनंदीन रहाटगाडगे चालवत असतो.. कधी कधी तर वाटते ना, की जणू दोन रात्रींमधे जो दिवस येतो ना, तो समजत पण नाही, इतका डिट्टो सारखा असतो तो आदल्या दिवसासारखाच.. अरे शाळेतलं वेळापत्रक सुद्धा बदलतं दररोज.. पण  आपण तेच ते करत रहातो.. म्हणूनच हा अभुतपुर्व उत्साह खुणावतो मला सारखा.. असं वाटतं रोजचं आयुष्य दिवाळीसारखं झालं तर काय बहार येईल नाही.. पण असं जरतर म्हणून थोडीना ते असं बहारदार होणार आहे.. शेवटी त्या आयुष्याला आकार देणारे आपणचं , मग तो कसा द्यायचा हे पण आपणचं नको का ठरवायला..

आता तुम्ही म्हणालं , ही अचानक एवढ्या गहन विषयात कुठे शिरली? पण ना, मी गेले कित्येक दिवस विचार करतेय.. किती लहानसहान गोष्टींनी कष्टी होतो आपण.. हातात चार काम घेऊन बाहेर पडावं आणि नेमकी आपल्याला हवी ती दुकानचं बंद असावीत, झाले .. जमलं एक जळमटं मनावर, ऑफ़िसमधून येताना लागलं भयानक ट्रॅफिक, वाजवले लोकांनी निरर्थक हॉर्न.. चला नवीन एक जळमट.. नवीन वैताग.. आज जरासा उशीर झाला उठायला, राहिली आज देवपूजा.. जमु द्या एक आणखी जळमट.. आज असं कसं मीठ जास्त पडलं बुवा भाजीत.. जमतचं नाही मला काही..या रे या नवीन जळमटांनो स्वागत आहे तुमचं.. इतका मन लावून कोड केला , आलाच कसा डिफेक्ट.. अरे किती ..अजून एक.. .. आठवडा झाला, घर आवरलचं पाहिजे आता.. किती रे पसारापुन्हा एक नवीन ….

मन दिसेनाच मला , दिसताहेत फक्त ही अशी असंख्य जळमटं.. मगं म्हटलं.. आपण कसं घरात दिवाळी आली की करतोच की आवराआवर.. स्वच्छता.. सगळं कसं लक्ख दिसतं ना मगं.. म्हटलं यावेळी घराबरोबरचं जरा मनाची आवराआवर पण करावी.. भलतीच धूळ, पसारा आणि बरचं काही जमा झालयंजरा झाडून पुसून लक्ख करावं सगळं मन.. एक एक जळमट उचलून भिरकावून द्यायचं ठरवलयं मी.. घरातली रद्दी कशी दर महिन्याला घालून टाकतो आपण.. मग मनात का अशी रद्दी साठून द्यायची

आज अगदी ठणकावून सांगितलयं मी या सगळ्या पसार्‍याला.. बास झालं तुमचं आता.. खूप वेळ मुक्काम ठोकलात..चला आता निघा बघू.. मुळीच आदरातिथ्य होणार नाही आता.. भलतेच चिवट आहेत पण सगळे..  काय पण कारण देऊन तळ ठोकताहेत..  जोरात जोरात ओरडून ऐकायला लावताहेत मला.. म्हणताहेत.. अगं आमचा नुसत्ता उच्चार केलास कुणापुढे तर किती सहानुभुती मिळते तुला.. लगेच कसे सगळे म्हणतात, बिचारी, किती काम पडतं ना तिला.. फार फार कष्ट करावे लागतात.. …किती स्ट्रेस.. किती ताणतणाव आहेत ग बाळे.. कशाला करतेस नोकरी.. का घरातले काम पण….

बास बास कान घट्ट बंद केलेत मी.. नाही नाही ऐकाचचं नाही मला तुमचं, नको मला सहानुभुती.. नाहीच मी बिच्चारी आणि व्हायचं पण नाहिये मला.. लागू दे कष्ट करायला..असू दे सवय माझ्या मनाला, शरीराला कष्टाची.. नाहीच आहे मला भिती .. मी शिकलेय आवडीचं.. नोकरीही स्वतःच्या हिकमतीवर मिळवलीय.. आपल्या आईबाबांनी नाही का केल्या नोकर्‍या ३०३० वर्ष.. कधी केली का कुरबुर त्यांनी? बरं त्यांच्या नोकर्‍या एवढ्या ताणतणावाच्या नव्हत्या असा ही युक्तिवाद करतील काही.. पण खरचं असं होतं का.. माझे आईबाबा दोघेही डॉक्टर..आपण निदान निर्जीव वस्तूंवर काम करतो.. उद्या काही गडबड झाली तर फार फार तर काय होईल.. की ते सॉफ़्ट्वेअर बिघडेल वा तत्सम.. पण डॉक्टर म्हणजे सगळा जिवाशी खेळ..आणि रोजचा..किती ताण असतील या पेश्याचे..पण कधी कुरकुर नाही ऐकली.. अजूनही वयाच्या बासष्ठाव्या वर्षी बाबांना मी तितक्याच उत्साहाने ऑपरेशन करताना पहातेच ना मी. त्यांचीच मुलगी आहे मी .. नाही नाहीच येऊ द्यायचाय छोट्या छोट्या गोष्टींवरून ताण स्वतःला..

खड्ड्यात गेला ताण तणाव..सगळ्याला पुरून उरणारे मी आता.. नकोत मला सहनुभुतीच्या कुबड्या..  नकोयत मला ही ओझी.. आणि नाहीच येऊ द्यायचाय असला फालतू ताण.. किती सुंदर गोष्टी आहे आयुष्यात.. किती नवीन काही शिकायचं, किती किती उत्तम उत्तम वाचायचयं..  किती छान जगायचं ..

तर या सगळ्या जळमटांनो या.. वेळ आलीय तुमच्या जाण्याची .. कायमचं भिरकावून देणार आहे मी या नसत्या ओझ्यांना… किती हलकं वाटतयं सांगू.. आणि एकदम स्वच्छ पण… आणि हो उत्साही.. माझ्या मनाची दिवाळी तर सुरू झाली सुद्धा अगदी आज आत्तापासूनच.. अगदी नीटसं, सुगंधी आणि चैतन्यदायी दिवाळी.. माझ्या मनाची दिवाळी…..

ता.क. : तुम्हा सर्वांना आणि तुमच्या उत्साही मनाला ही दिवाळी अतिशय सुख-सम्रुद्धीची, भरभराटीची जावो… 🙂

6 views0 comments

Recent Posts

See All

प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, जिथे काय जादू असते माहित नाही पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी मनासारख्या जुळून येतात. आमच्या अपार्टमेंट मध्ये अशीच एक माझी आव

एक एक धागा नकळत उलगडत जातोय…ईकडून तिकडे.. एक एक वीण जुळवण्यासाठी.. कधी प्रवाहाबरोबर..कधी प्रवाहाविरुद्ध.. कधी त्याच्यासारख्या इतर धाग्यांच्या बरोबरीने..तर कधी त्यांना छेदत..गुंफण घालत..गिरकी घेत..कधी

bottom of page