एक अतिशय नितांत सुंदर सिनेमा पाहिला मी गेल्या आठवड्यात.. आता नाव सांगितलं ना तर अत्यंत लेट करंट लेबल बसण्याची दाट शक्यता आहे..हा एवढा मोठा धोका असूनही, तो अनुभव कथन करावासा वाटतोय .. खरचं हा सिनेमा केवळ सिनेमा नाहीच आहे मुळी..तो एक अनुभव आहे.. हा सिनेमा आला १९९४ मध्ये.. तेव्हा आपली अवघी हिंदी सिनेसृष्टी हम आपके है कौन मय होती.. अर्थात मी पण.. आणि या अप्रतिम कलाकृतीकडे लक्ष जायला तब्बल १५–१६ वर्ष जावी लागली.. तर आता नमनाला घडाभर तेल पुरे… तर सिनेमा आहे फॉरेस्ट गम्प..
अरे काय भन्नाट चित्रपट… टॉम हॅन्क्स हा अतिशय संवेदनशील आणि चतुरस्त्र अभिनेता आख्खा चित्रपट स्वतःच्या अभिनयच्या बळावर व्यापून टाकतो..
सुरुवात होते तीच इतकी मनाची पकड घेणारी.. आपला हा फॉरेस्ट गम्प वाट पाहतोय एका बसची.. आणि शेजारी बसचीच वाट बघत बसलेल्या एकीशी तो अचानक संभाषण सुरू करतो आणि विषय तर काय तर पायतले बूट.. दोन क्षण कळेनासे होते.. की हा नक्की काय बोलतोय…
लगेच सीन दुसरा.. एक लहानगा मुलगा बसलाय एका बेंचवर बसचीच वाट बघत..
या मुलाकडे पहाताना सर्वात प्रथम लक्ष जाते ते त्याच्या पायांकडे.. कसल्याश्या लोखंडी आधाराने जखडलेले त्याचे पाय, आणि चेहर्यावरचे त्याचे निरागस भाव.. आणि वार्याबरोबर उडत येणारे एक पीस.. सगळा माहोलच आपण आता या फ़ॉरेस्ट गम्पच्या विश्वात रंगून जाणार आहोत अशी ग्वाही देत रहातो हा प्रसंग..
हळूहळू.. अगदी अलगद कथा उलगडत जाते.. पायाने अधू असणारा (खरं तर त्याच्या पाठीच्या मणक्यात काहीतरी दोष असतो ज्यामुळे.. तो नीट चालू शकत नसतो) हा फॉरेस्ट आणि त्याची आई दोघेच रहात असतात..ग्रीनबो , अलाबामामधे.. फॉरेस्ट फक्त पायानेच अधू नसतो तर त्याचा I.Q. सुद्धा सर्वसामान्यांपेक्षा कमी असतो..पण त्याची आई सतत त्याला सांगत रहाते..की तु वेगळा नाहीस..जे जे तुझ्या वयाचे तुझे मित्र करू शकतात ते सगळे तु सुद्धा करू शकतोस.. त्याच्या मनावर हे ती अगदी सोप्या भाषेत आणि निरतिशय प्रेमाने हे बिंबवत रहाते…
मित्र म्हणावे तर असे कोणी नसतेच फ़ॉरेस्टला.. पण एक मैत्रिण मात्र मिळते.. स्वतःला जणू पक्षी होवून खूप खूप दूर उडून जाता यावं म्हणून प्रार्थना करणारी.. फ़ॉरेस्टला मनापासून साथ देणारी.. आणि त्याच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर अमुलाग्र बदल घडवून आणणारी जेनी..
या दोघा लहानग्यांना एकदा त्यांचेच काही मित्र त्रास देतात.. त्यांच्यापासून बचावासाठी फॉरेस्टला ती जोरात ओरडून सांगती ” रन फॉरेस्ट रन.. ” साधं नीट चालता न येणारा हा मुलगा.. आधी अडखळत, धडपडत..पळायला लागतो.. त्याच्या पायाची बंधन गळून पडतात.. जणू नवीन आयुष्य मिळत त्याला ..आता जिथं जायचं तिथं हा पठ्ठ्या पळतचं जायला लागतो.. वयाची ८–१० वर्ष बंधनात घालवल्यावर मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आनंत अवर्णनीय असतो त्याच्या लेखी..
असेच वर्ष उलटतात.. केवळ त्याच्या अतिशय वेगाने धावण्याच्या या गुणामुळे.. त्याचं महविद्यालयीन शिक्षण अतिशय सुखकर होत.. पुढे हा सैन्यात जातो.. व्हिएतनाम युद्धात लढतो, आणि तिथे प्रवेश होतो त्याचं आयुष्य पुन्हा बदलून टाकण्यात महत्वाचा वाटा असणार्या दोघांचा..एक त्याचा कमांडिंग ऑफिसर डॅन आणि एक जवळचा मित्र बेंजामिन ब्लू.. उर्फ़.. बब्बा.. (bubba) .. हा त्याचा जिवश्चकन्ठश्च मित्र बनतो.. हा bubbaभलताच मजेशीर अवलिया असतो.. हा अहर्निश विचार करत असतो.. श्रिम्पचा..त्याला एक मोठी बोट बांधायची असते.. आणि आयुष्यभर श्रिम्प पकडत समुद्रकिनारी रहायचं असतं..फॉरेस्ट त्याला वचन देतो या युध्दानंतर मी तुला तुझी बोट बांधायला मदत करेन..
पण नशीबाला हे मान्य नसतं.. bubba.. युध्दात मृत्युमुखी पडतो.. आणि फॉरेस्ट त्याच्या वेगाने पळण्याच्या जोरावर पुन्हा एकदा.. स्वतः तर वाचतोच पण.. लेफ़्टनंट डेन सहीत त्याच्या अनेक सहकार्यांना वाचवतो..
युद्ध संपत..ठरल्याप्रमाणे हा श्रिम्पसाठी बोट बांधतो सुद्धा आणि बोटीचं नाव जेनी… , डेनच्या मदतीने यशस्वी सुद्धा होतो.. यशस्वी होवून घरी परततो.. दरम्यान त्याची आई वारते.. जेनी त्याला लग्नाला नकार देते.. हा अशाच मनाच्या एक अवस्थेत पळायला सुरुवात करतो , आणि पळतच रहातो.. थोडे–थोडके दिवस नव्हे तर तब्बल तीन वर्ष आणि काही महिने.. त्याला अनेकजण साथ द्यायला धावू लागतात,,
मग अचानक तो थांबतो, घरी परततो.. जेनीला भेटतो, आणि तिच्या बरोबर असणार्या आपल्या मुलाला, तिच्याशी लग्न करतो, अतिशय अल्प सहवासात तिच्या आजारपणात तिला साथ देतो, तिच्या पश्चात अतिशय प्रेमाने मुलाला जपतो, तो आपल्यासारखा नसून अतिशय हुशार आहे या कल्पनेनेच हुरळून जातो…
या एकाच माणासाच्या आयुष्यात किती घटना घडतात.. चित्रपट बघताना जाणवलचं होतं.. पण आज लिहिताना मी हा चित्रपट पुन्हा जगला.. किती नानारंगी रंगानी रंगलं होतं त्याचं आयुष्य..
केवळ मन लावून आणि श्रद्धेने काम करण्याच्या एका गुणामुळे.. कुठल्या कुठे पोचला फॉरेस्ट..बुद्धी नाही म्हणून हिणवला गेलेला फॉरेस्ट कुठे आणि हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत कल्पनेपलिकडे यश मिळवणारा फॉरेस्ट कुठे.. का आपण फक्त पुस्तकी बुद्धीला महत्व देत रहातो अजून ..फार फार प्रकर्षाने जाणवलं हे.. एक सच्चा मित्र, सच्चा प्रेमी, अतिशय प्रामणिक सहकारी, एक हळावा मुलगा, फार फार शूर, धाडसी फॉरेस्ट समोर आला या चित्रपटातून..
आता टॉम हॅंक्सबद्दल बोलण्याची माझी कुवतच नाही.. काय सुंदर अदाकारी.. काय सहजसुंदर अभिनय, त्याने भुमिकेचे bearing असे काही पकडले आहे ना..जणू तो आणि फक्त तोच फॉरेस्ट साकारू शकतो.. जगलाय तो ती भुमिका.. चित्रपट बघायच्या आधी मला वाटलेले, की खूप रडका आणि depressing असेल हा चित्रपट.. पण अतिशय हलक्याफुलक्या शैलीत मांडलाय सगळा प्रवास.. एक एक संवाद आठवून आठवून हसत राहवे, विचार करावा.. रंगून जावे…
खरचं, हा नुसता पहाण्याचा चित्रपट नव्हेच.. हा एक प्रवास आहे, एक अनुभव आहे.. एक निरतिशय सुंदर अनुभव…अगदी प्रत्येकाने अनुभवायलाच हवा असा अनुभव !!!…
コメント