top of page
Writer's pictureMadhura

फिल्मी चक्कर..

गेले काही दिवस २-३ वेगवेगळ्या पोस्टस लिहून अर्धवट ठेवायचे काम मी अतिशय नेटाने करतेय… आज आता आणि एक नवी पोस्ट लिहायला सुरुवात करतेय .. पण आज मात्र ही नक्की पूर्ण करायची असं अगदी पहिल्या ओळीपसून घोकतेय.. कारण.. कारण आज ना मी माझ्या सर्वात आवडत्या विषयावर लिहिणार आहे… मी माझ्याबद्दल सांगतानाच म्हटले नव्हते का.. की मी ना तद्दन (की अट्टल म्हणू) फिल्मी आहे.. जाम आवडते मला सिनेमा पहायला… आणि खास करून लव्हस्टोरी..

 मला ओळखणारे सगळे मला सिनेमांचा डाटाबेस म्हणतात.. का ते कळेलच तुम्हालाही…

एकदा ना ईंजिनीरिंगला असताना, माझ्या रूममेटनी (अर्थातच ती ही इतकीच फ़िल्मी आहे हे तुम्ही सुज्ञ वाचकांनी ओळखलेच असेल नाही.. 🙂 ) फ़िल्मफ़ेअर मासिक आणले होते.. अहाहा.. खजिना खजिना म्हणतात तो हाच असेच वाटले आम्हाला..

सारं मासिक आम्ही वाचून काढले.. आणि माझे तर ते मुखोद्गत झाले होते , इतके.. की माझ्या मैत्रिणीने त्यावर माझी तोंडी परिक्षा घेतली.. आणि मी पैकीच्या पैकी गुण मिळवून त्यात उत्तीर्ण झाले.. तर असे आहे माझे फ़िल्मी ज्ञान …

बापरे.. लिहित काय होते आणि कुठे पोचले.. असेच होते.. सिनेमांबद्दल लिहायला लागले की भरकटायला होते…असो.. आता गाडी आणते मूळ मुद्द्यावर…

तर कुठे होते मी.. हां.. तर माझ्या या सिनेमा प्रेमाचे बाळकडू मला ना माझ्या बाबांकडून मिळाले.. ते स्वतः खूप सारे सिनेमे पहायचे..

 दिलीप कुमार त्यांचा अगदी पेट्ट हिरो.. त्याचे सगळे डायलॉग यांना तोंडपाठ.. मुघल-ए-आझम बघावा तर माझ्या बाबांबरोबर..

इतकी सखोल महिती की काही विचारू नका.. अगदी प्रत्येक संगितकारा पसून, दिग्दर्शकाला आलेल्या अडचणींपर्यन्त.. सगळं कसं स्पष्ट..

मी त्यांना चिडवायचे तुम्हाला अगदी स्पॉट्बॉय सुद्धा माहित असतील…

सो..जशी राजा तशी प्रजा या अनुशंगाने माझे सिनेमा प्रेम पाळण्यातच दिसले असावे… 🙂 मी ना बरेचसे सिनेमे माझ्या बाबांबरोबर जाऊन बघितलेत..अजून मैत्रिणी-मैत्रिणी सिनेमे पहायचा ट्रेंड सुरू व्हायचा होता.. आमच्या कराडमधले जे सगळ्यात चांगले theatre होते ना त्याचे मालक माझ्या बाबांचे बालमित्र त्यामुळे कुठला ही पिक्चर कुठपासून आणि कुठे ही बसून बघायची मुभा होती.. अर्थात बाबा बरोबर असतील तरच.. 🙂 मी अभ्यासात हुशार असल्याने आणि ते सगळे अभ्यास वगैरे व्यवस्थित पार पाडत असल्यामुळे या माझ्या आवडीला बाबांनी कधी हरकत घेतली नाही.. आणि मग ही आवड चांगलीच वृव्द्धिंगत होत गेली…परीक्षा संपली की मी आणि बाबा जायचो सिनेमाला… किती बघितले असे .. याची गणतीच नाही.. 🙂

आज ना मला अश्याच काही मनात अगदी घर करून राहिलेल्या सिनेमांबद्दल सांगावसे वाटतेय.. बरेचसे तुम्ही पाहिले ही असतील.. मला खूप खूप आवडणारे हे काही चित्रपट…

सुरुवात तर माझ्या सर्वात आवडत्या चित्रपटाने केली पहिजे.. आणि तो म्हणजे सुजाता.. खरं हा मी माझ्या आत्याकडे सुट्टीत रहायला गेलेले तेव्हा टीव्हीवर पाहिला.. सुरुवातीला नको नको म्हणत.. पण नंतर.. … खरं तर मी हा सिनेमा पाहिला तेव्हा मी आठवीत असेन..

कितीसा कळला तेव्हा कोणास ठाऊक..पण आता दोनेक वर्षांपूर्वी त्याची सीडी खूप धडपड करून (त्या हकिकती वर स्वतंत्र पोस्ट होईल) मिळवली. आणि किती पारायणे केली त्याची मग…  

इतका सहज अभिनय, कुठूनही आपण अभिनय करतोय याची कल्पना ही न देता..सुरेख काम केलय नुतननी..

काय दिसलीय ती.. सुरेख.. तिच्यापुढे आजच्या सगळ्या नट्या काहीच नाही..

प्रत्येक संवाद जणू तिच्यासाठीच लिहिला गेलाय..

अतिशय बोलके डोळे.. तिचा तो शालीन चेहरा..आणि किणकिणता आवाज.. बघत रहावे तिच्याकडे असे वाटते..

कमालीचा सोशिकपणा पण तो कुठेही मेलोड्रॅमॅटीक न होवू देता फ़ार फ़ार सुंदर वठवलाय नुतनने..

सुनील दत्त बद्दल तर काय लिहायचे..

त्याचे ते तिच्यावर मनापासून प्रेम करणे आणि इतक्या सहजतेने तिचे सत्य स्विकारणे..

तिला समजावताना तिला सांगितलेली ती गांधीजींची गोष्ट..

फ़ार सहज आणि अतिशय नैसर्गिक.. कृत्रिमतेला कुठेही वावच नाही..

मला तर त्यातील ललिता पवार पण फार आवडल्या.. त्यांनी साकारलेली आजी एकदम पटून जाते अगदी त्या प्रेमाच्या विरोधी पार्टीत असल्यातरी…

त्यातले जलते है जिसके लिये गाणे तर अजरामर.. आक्ख गाणं दोघांच्या फक्त चेहर्‍यावर कॅमेरा आहे आणि काय लाजवाब मुद्राभिनय ..वा वा….

साधी सोपी गोष्ट.. ब्राम्हण कुटूंबात वाढलेली पण जन्माने दलित असणारी मुलगी आणि उच्चभ्रु कुटूंबातला मुलगा यांची प्रेमकहाणी..

 हा विषयच त्याकाळी धाडसी.. पण इतकी साधी सोपी मांडणी.. आणि एकदम बढिया दिग्दर्शन.. बिमलदांची बातच काही और…

खरं तर हा सिनेमा माझ्या पिढीचा नव्हे.. पण तरीही आपला वाटणारा.. आणि त्याच्या साधेपणातच सारे धरून ठेवणारा म्हणून खास…

असाच आणि एक साधा सरळ सिनेमा म्हणजे.. मिली.. 

जया आणि अमिताभ इतके आपल्यातले वाटतात..

कुठेही अभिनयाचा अतिरेकी अभिनिवेष नाही..

जयाचं ते मोकळं हसू..अमिताभचं ते स्वतःशीच लढणं,

त्याचा तो दुष्ट राक्षस आणि तिचं ते आपल्या नावाची कथा सांगणं..

त्याच्या मनातील ती उदासिनता तिने हळूहळू त्याच्याही नकळत काढणं,

तिच्यासाठी , तिच्या हास्यासाठी त्याचे ते स्वतःला बदलणं,

आपल्या लेकीच्या आजरपणाने मनाने खचलेले पण चेह‍र्यावर हसू कायम ठेवणारे अशोककुमार..

सगळं कसं एका संपूर्णत्वाला आलेल्या चित्रसारखे.. ह्र्षिकेश मुखर्जीं बद्द्ल तर बोलू तितके कमीच आहे…

 त्यांचा हर एक चित्रपट एक एक जीवनाचे साधेच असेल पण तत्वज्ञान सांगून जातो..

पूर्वेतिहासामुळे एक मनातल्या मनात कुढणारा नायक, आयुष्याचा मनमुराद आनंद घेणारी पण हाती चिमुकला वेळ उरलेली नायिका..

तिच्यावरचे सगळ्यांचेच प्रेम, आणि तिचा त्याच्या सच्चेपणा वरचा विश्वास इतका सुरेख टिपलाय ह्र्षिकेश मुखर्जींनी.. की काय दाद द्यावी…

मैने कहा फुलोंसे.. किती वेळा ऐकलं तरी नव्याने उर्जा देणारे गाणे.. सुरेख.. दुसरा शब्द नाही…

 या सिनेमांनी ना आयुष्य सुंदर केल असं वाटत..मला ना यांचा साधेपणा फार फार भावला…

त्यातला सच्चेपणा आणि भावुकता आज इतक्या वर्षांनीही मनाला तितक्या आवेगाने भिडते.. अ

जूनही बरेच सिनेमे राहिलेत लिहायचे.. पण तुर्तास एवढेच ठीक आहे.. कारण..

या पोतडीत अजून दडलय़ काय हे शोधण्याआधी मलाच पुन्हा एकदा हे दोन्ही चित्रपट पहावेसे वाटतायत..

सो मंडळी… उरलेले ब्रेक के बाद.. 🙂

0 views0 comments

Recent Posts

See All

खिडकी

प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, जिथे काय जादू असते माहित नाही पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी...

निरगाठ..

एक एक धागा नकळत उलगडत जातोय…ईकडून तिकडे.. एक एक वीण जुळवण्यासाठी.. कधी प्रवाहाबरोबर..कधी प्रवाहाविरुद्ध.. कधी त्याच्यासारख्या इतर...

Comments


bottom of page