top of page
Writer's pictureMadhura

निरगाठ..

एक एक धागा नकळत उलगडत जातोय…ईकडून तिकडे.. एक एक वीण जुळवण्यासाठी.. कधी प्रवाहाबरोबर..कधी प्रवाहाविरुद्ध.. कधी त्याच्यासारख्या इतर धाग्यांच्या बरोबरीने..तर कधी त्यांना छेदत..गुंफण घालत..गिरकी घेत..कधी स्वतःच्याच तालावर विहरत..रंगून जाऊन …स्वतःला या महावस्त्राच्या विणीत अडकवून घेत चाललाय वेडा..

किती वर्षांचा प्रवास .. कुठे जायचे ठाऊकच नाही.. तरी पण सगळ्यांबरोबर स्वतःला अडकवत चाललाय वेडा… या विणीत गुंफुन घेण्यासाठी कधी स्वतःलाच हलकीशी गाठ मारून घेतोय.. स्वतःहूनच किती पाश, किती बंध निर्माण करतोय.. अनेक अनेक गाठीतून वेगळा ओळखताही येऊ नये इतका बेभान गुंतत चाललाय.. खरचं एक वेडा अवलिया….

पण… पण या गाठी हळूहळू निरगाठी बनताहेत का..त्याला कायमचं त्या वस्त्रात अडकवून टाकणार्‍या निरगाठी… किती खोल…किती आत.. कुठे कुठे आहे कुठे त्याचे स्वतःचे अस्तित्व..ओळखू पण येत नाहिये..कसं आवळून टाकलयं त्याला या बाकीच्या सगळ्या धाग्यांनी…त्यांच्या वेढ्यांनी.. त्यांच्या गाठींनी.. कसले हे पाश..कसली नसती जबाबदारी..नुसता गोंगाट ..नुसता कोलाहल माजलाय सगळा… आणि हा स्वतः कसा इतका रमलाय या बंधनात..

अरे वेड्या मुक्त हो..या बंधनांसाठी का जन्म झालाय तुझा.. बघ.. बघ कसा स्वच्छंद आहे मी.. कसले पाश नाही.. कसलीही मोह माया नाही.. कोणी कोणी नाही अडवणारं..स्वैर..मुक्त मी…कुठल्याच वस्त्रासाठी नाही मी..मी फक्त, माझा मी… आठव ना तुझं ते रुप.. ते शुभ्र रुपडं.. कशाला शिरलास या विणीत.. बघ तुझा रंगही तुझा नाही उरला..कसल्या गुंत्यात अडकवलयसं स्वत:ला…कशाला हा गुंता, कशाला शोधायच्या वाटा.. कशाला या असल्या गाठी..चल ऊठ.. बाहेर पड.. दाखव त्यांना तुझं खरं रुप..उसवून टाक तुझी ही वीण.. कळू दे त्यांना तुझी किंमत..फाटलं तर फाटू दे सारं वस्त्रचं..तुला काय घेण की देण..असाचं जग माझ्यासारखा.. निर्बंध…ऊठ.. ऊठ.. तोडून टाक ही निरगाठ.. हो मोकळा हो.. ऊठ..ऊठ…….

सारं कसं शांत.. शांत.. संथ..प्रसन्न.. उबदार आणि अलवार.. काय सुरेख रंग.. इतक्या रंगांच्या उधळणीतूनही लक्ष वेधून घेणारी शुभ्र वेलबुट्टी.. किती सोज्वळ.. किती नाजूक.. सगळ्या रंगांना आधार देणारी.. जपणारी…सगळेच कसे समरसून गेलेत एकमेकात.. सारं कसं एकसंध.. एकरूप.. एकत्र म्हणूनच खर्‍या अर्थे परिपूर्ण वस्त्र.. खरं संपन्न…

काय करू मी तरी.. दिसलीच नाही मला कधी कुठलीच निरगाठ.. ती उसवायला.. बंधनं जाणवलीच नाहीत मला, उभ्या जगण्यात..होते फक्त बंध.. मायेचे.. एकत्र मिळून जगण्याचा आनंद लुटला मी भरभरून.. आणि कसलं आलयं हे एकाकी स्वत्व.. स्वतःला असं एकटं..इतरांपासून वेगळं करण्यात काय मोठं स्वत्व जपणं.. भेटलेल्या हर एक रंगात एकरंग होवूनही टिकलचं की माझं अस्तित्व.. कशाला मग ही मायेची वीण उसवायची.. का तोडायचे पाश, आपल्यांबरोबरचेच. वेगळं होवून माझा माझा नवा गुंता कशाला करायचा.. कसली आलिय मजा या असल्या एकाकी स्वैर जगण्यात.. असल्या निरगाठी सोडवण्यापेक्षा माझा हा प्रेमाचा गुंताच बरा….

6 views0 comments

Recent Posts

See All

खिडकी

प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, जिथे काय जादू असते माहित नाही पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी...

Comments


bottom of page