top of page
  • Writer's pictureMadhura

का ? कशासाठी? कुणासाठी ? आणि कधीपर्यंत ???

का ? कशासाठी? कुणासाठी आणि कधीपर्यंत ?????

एक होती चिऊ आणि एक होता काऊ काऊचे घर होते शेणाचे आणि चिऊचे घर होते मेणाचे एकदा काय झालं, खूप मोठा पाऊस आला , अगदी धो-धो पाऊस बिचाऱ्या काऊचे घर गेले वाहून , काऊ मग घाबरला,  त्याला मग आठवण झाली चिऊची आणि तिच्या मेणाच्या घराची.. काऊ गेला चिऊकडे, म्हणाला “चिऊताई चिऊताई, दार उघड , माझं घर गेलं गं वाहून या धो-धो पावसात, मला येऊ दे ना तुझ्या घरात..” चिऊताई म्हणाली ” थांब रे काऊ, माझ्या बाळाला मी आंघोळ घालते आहे  , मग उघडते दार ” बराच वेळ झाला तरी चिऊताई काही दार उघडेना , मग काऊ पुन्हा म्हणाला “चिऊताई चिऊताई, दार उघड..” “थांब रे काऊ जरा वेळ, मी माझ्या बाळाला तीट लावतेय ” चिऊताई म्हणाली अजून थोड्या वेळाने काऊनी पुन्हा चिऊताईला आवाज दिला पण परत चिऊताई म्हणते कशी “शू ……. नको ना रे आरडओरडा करू, मी माझ्या बाळाला झोपवतेय आणि मग उघडते दार ”

लहानपणापासून सगळ्यांनीच ऐकलेली, सांगितलेली गोष्ट ही चिऊ नि काऊची !! त्या गोष्टीत जाणवणारी काऊची असहायत्ता आणि चिऊची तिच्या पिल्लाविषयीची आत्मियता ! पण आज अचानकच गोष्ट नव्याने ऐकताना नकळत नव्याने समजत गेली मला.. आणि मग मात्र वाटते तितकी छोटी राहिलीच नाही  ती !!

आज ही चिऊ धडपडतेच आहे तिच्या पिल्लांसाठी..त्यांच्या पंखात उत्तुंग भरारी मारण्याचे बळ यावे म्हणून .. तिच्या नि त्याच्या संसाराला अधिक सुंदर करण्यासाठी नवनव्या वाट शोधताना , घरासाठी , पिल्लांसाठी आणि अगदी स्वतःसाठीसुद्धा अखंड धावत असतात दोघेही तो आणि तीही !!

पण कधी मनात येते… या धावपळीमध्ये ज्याच्यासाठी ही  सगळी पळापळ करायची त्या पिल्लांना येत का मनापासून शांतपणे भरवता, तीट लावता आणि अंगाई म्हणून निजवता? डोळे भरून पाहण्याची तरी होते का मग सवड? त्याच्या किलबिलाटाला येतो का देता तितकाच उत्साही प्रतिसाद? एखाद्या असहाय्य काऊला मदतीचा हात येते का देता त्याच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी , कि आपली ही धावपळ इतका वेग घेते कि त्यात दिसतच नाही आपल्याला एखाद्या काऊचे घर वाहून जाताना?

खरंच, का हे धावणे ? कशासाठी? कुणासाठी? आणि कधीपर्यंत? रंगीत आणि मोठ्या फुलांच्या शेजारी , शुभ्र आणि लहानगी फुले सुद्धा डोलाततच ना ? सूर्यासारखे तेज नाही म्हणून काजवा प्रकाशायचा का थांबतो? समुद्रासारखे फेसाळते पाणी नाही म्हणून नदी का वाहायची थांबते? मग आपलाच का अट्टाहास स्पर्धेत सर्वात पुढे जाण्याचा? दर वेळी नव्याने स्वतःला सिद्ध करण्याचा ? आणि या सगळ्या स्पर्धेत आपण आपल्यालाच हरवून बसतो हे का नाही येत लक्षात आपल्या?

आता तर आठवत ही नाही ना  , किती दिवस झाले..  , ब्रह्मकमळाच्या कळीचे फुल होताना पाहण्यासाठी रात्र  रात्र जागवून? थंडगार संगमरवाराला हात लावून? उंच उडी मारून घंटानाद करून? पहिल्या पावसात वेडे  होऊन चिंब भिजून? पावसात भिजलेल , थरथरणारे माऊचे पिल्लू हळुवारपणे घरात आणून? आणि अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत खळखळून हसून सुद्धा? मोठे झाल्याची लक्षण म्हणेल कुणी याला … पण मोठे होण्यासाठी मनातले मुलं आणि जीवन भरभरून जगण्याची वृत्तीच हरवून बसावी असे थोडीच आहे ?

पण, कुठे तरी आपल्याला थांबले पाहिजे , क्षणभराची विश्रांती म्हणून तरी .. आणि ऐकायला हवी हाक आपल्याच मनाची .. साद घालताच असते आपले मन आपल्याला , त्यालाही हवाच असतो आपला वेळ , त्याची विचारपूस करण्यासाठी , त्याला काय हवे-नको ऐकण्यासाठी त्याच्या ही असतातच कि भावना.. नेहमीच ते आपले ऐकत असते बिचारे, ऐकू या कि त्याला ही काय म्हणायचंय..

या क्षणभर विसाव्यात विसावूयात आपल्याच आपल्यांबरोबर , आपल्या धकाधकीच्या जीवनातील काही दोन-चार क्षण तरी मिळावेत म्हणून धडपडणाऱ्या आपल्या प्रत्येक आप्ताबरोबर !

पाहूया सभोवताली , आपल्यासारख्याच धावणाऱ्या एखाद्याला हवीय का आपली मदत ? त्याच्या अडचणीमध्ये , त्याच्या प्रश्नांमध्ये, तर कधी त्याच्या सुखांमध्ये सामील होण्यासाठी  आणि कधी अगदी मूकपणे फक्त एक आश्वासक सोबत देण्यासाठी ..

कदाचित सापडतील ही मग आपल्याला  या “का, कशासाठी, कुणासाठी” अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे एखाद्या अवचित वळणावरती आणि देऊन जातील आपल्याला नवीन उमेद नव्याने वाटचाल करण्यासाठी क्षणभर  विश्रांतीच मग होऊन जाईल,  एका रम्य स्वप्नाच्या वास्तवात उतरण्याची सुरुवात !!!

1 view0 comments

Recent Posts

See All

प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, जिथे काय जादू असते माहित नाही पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी मनासारख्या जुळून येतात. आमच्या अपार्टमेंट मध्ये अशीच एक माझी आव

एक एक धागा नकळत उलगडत जातोय…ईकडून तिकडे.. एक एक वीण जुळवण्यासाठी.. कधी प्रवाहाबरोबर..कधी प्रवाहाविरुद्ध.. कधी त्याच्यासारख्या इतर धाग्यांच्या बरोबरीने..तर कधी त्यांना छेदत..गुंफण घालत..गिरकी घेत..कधी

bottom of page