एक सकाळ अशीही… कधी कधी असं काहीसं होत ना की, आपल्याला आवडणाऱ्या या जागी, सगळ्याच गोष्टी अचानकच एकत्र येतात.. एखादा देखावा अगदी पूर्णत्वाला जावा तसे काहीसे.. अगदी योग्य ते चित्र, योग्य त्या जागी, हव्या त्या रंगात आपल्या समोर उभे राहावे तसे.. असेच काही झाले एका सकाळ ….
मी बस मधून माझ्या घरी कराडला चालले होते.. बघितले तर पुणे कराड प्रवास फक्त तीन – साडे तीन तासांचा..पण या एवढ्याश्या वेळात आयुष्यभर लक्षात राहावे असे क्षण दिले मला या प्रवासाने… एक नवी दिशा दिली, आयुष्यभर पुरेल अशी दृष्टी आणि स्वतःशीच नवी ओळख दिली…
एक सुंदर सकाळ .. हवेत आलेला गारवा, हलकेच पडून गेलेला पाऊस… त्या पावसात एक जादू होती.. हळुवारपणे पडणाऱ्या सरींनी हलकेच मला हळवं कसे काय केले उमगलेच नाही मला…. साऱ्या वातावरणालाच सुगंधित करून टाकणाऱ्या मृदगंधाने गंधित केले माझे मन … ते इवल्याश्या पानांवर पडणारे टपोरे थेंब आणि त्यांचा होणारा नाद मला माझ्यापासूनच भुलवू लागला होता.. सभोवताली पसरलेली हिरवीगार शेते , बागा सगळा निसर्गच जणू आज पावसाचे गाणे गात होता… सुस्तावलेला रस्ताही आज पावसाला जणू वाट करून देत होता.. अशा सुंदर चित्रात मी गुंगून गेले होते , कदाचित हरवूनही गेले होते….
आणि यावर कडी म्हणून की काय.. माझ्या हातात होते एक पुस्तक …. पुस्तक म्हणू की पुस्तकापेक्षाही अगदी मन्मनात निनादात राहावे असे जीवनगाणे म्हणून त्याला.. ” बेला फुले आधी रात ” शं. ना. नवरे यांची ही अप्रतिम कलाकृती … शं. ना म्हणत होते …. “आता कुठे उजाडू लागलं आहे.. . ही श्रावणातली सकाळ माझ्याशी बोलू पाहत आहे.. अंगणातल्या प्राजक्ताची फुले आता पडू लागली आहेत..माझ्या समोरच्या खिडकीतून त्यांचा सुगंध लाल-चुटूक पावलांनी आत येऊ पाहत आहे.. श्रावणातल्या पहाटेच्या कळीचे सकाळच्या कळीत रुपांतर होऊ लागत तेव्हा गंधाची अशीच उधळण होते…रात्री चोरपावलांनी येऊन गेलेल्या पावसामुळे हवेत गारवा आहे, बोचणारा आणि तरीही हवाहवासा वाटणारा .. आज फार फार उत्साह वाटत आहे… मनात जे जे दाटले आहे ते ते सगळे रूप घेऊ पाहतेय…”
शब्दांची जादू काय अफाट असते पहा ना…. वाचता वाचताच वाटू लागले आपल्याही मनातले सगळे आज शब्द रूप घेईल खरे….. शब्द्नाच्या जाळ्यात येईल कदाचित पकडता हे सगळे सौंदर्य… सौंदर्य… या सगळ्या निसर्गाचे… ह्या शब्दांचे… वाटले, ह्या सौंदर्याशी बोलायला चार भिंतीच्या बाहेर पडले पाहिजे.. धुके पसरलेल्या रस्त्याने चलात राहिले पाहिजे, कुठल्याही लक्ष्याचा पाठलाग न करता ..निवांतपणे..त्याला समजून घेत… पायाला स्पर्श झाला पाहिजे ओल्या मातीचा.. जाणवली पाहिजे ती बोचरी थंडी.. ती हिरवीगार हवा पांघरली पाहिजे अंगभर .. साठवले पाहिजेत ते पक्षांचे निनाद.. अगदी अगदी स्वतःला विसरले पाहिजे….
त्या शब्दांनी जादू केली होती.. माझ्या मनाला आनंदाबरोबरच एक नवी दिशा मिळाली होती या सृष्टीच्या अफाट सौंदर्याकडे बघायची… कुठे तरी आत खोलवर एक नवी जाणीव जन्म घेत होती, आणि मला सांगत होती, बघ तरी या सुंदर निसर्गाकडे, त्याच्या पूर्णत्वाकडे, आणि ही किमया साधली होती शं. नां. च्या त्या शब्दांनी… आज कळले मला.. दोन शक्तिस्थाने … निसर्ग आणि शब्द.. …
प्रवास हा इतका आनंददायी असू शकतो हे आज पहिल्यांदाच जाणवले मला.. शब्दांची ताकद अफाट असते आज पहिल्यांदाच अनुभवले मी… त्या शब्दांनी, त्या सुंदर निसर्गाने काय केली किमया कळलेच नाही, कळलेच नाही कसा झाला प्रवासातला तो एकटेपणा दूर, कशी मिळाली सोबत त्या शब्दांची, त्या निसर्गाने गायलेल्या सुरांची.. अशी सोबत की अगदी माझी मलाच जाणीव राहू नये आणि नकळत त्या सोबतीची मात्र मैफिल बनून जावी….. मैफील शब्दांची , मैफील सुरांची, मैफील त्या निसर्गात सामावणाऱ्या त्या प्रत्येकाची ज्यांनी हे क्षण अनुभवले आणि अगदी त्यांच्याही नकळत मन्मनात रुजवले….
Comments