top of page
Writer's pictureMadhura

एकदाच फ़क्त एकदाच

अचानक विचारले तर चटकन आणि नेमकी वर्ष सांगता ही येणार नाही कदाचित…

पण तसं पाहिलं तर थोडी थोडकी नव्हे तब्बल तेरा वर्ष झाली तिला जाऊनही.. जेमतेम सातवीत होते मी आणि ताई अकरावीला… काळाच्या ओघात जखमा भरल्या जातात , पुस्तकात वाचलेले आणि अगदी इथे तिथे ऐकलेले वाक्य .. पण खरं सांगू, कधी अगदी कधी , म्हणून पटले नाही.. पुसट होत असतील कदाचित पण भरल्या .. नाही शक्यच नाही…

शाळा, मग कॉलेज , नोकरी , लग्न या सगळ्या प्रवासात कुठे तरी गुंगून गेलो आम्ही.. आठवण यायची तिची खूप सारी.. आधी फ़ार जास्त मग हळूहळू पुसट..पण , माहित नाही आजकाल फार फार प्रकर्षाने ती मनात पिंगा घालतेय..आधी ..मनात यायचे ती असती तर किती छान झाले असते नाही… पण आजकाल वाटू लागलयं ती हवीच आहे मला आत्ता याक्षणाला माझ्या बरोबर.. अगदी इरेला पेटून , हट्टाने तिला म्हणावे हवीयस मला तू आज.. नुसती आठवण म्हणून नाही..तू प्रत्यक्ष तू..

आजही डोळे बंद करून तिला पाहिले ना.. डोळ्यासमोर येतो तिचा अतिशय शांत चेहरा..                                 

तिच्या डोळ्यातील ती हुशारी.. आणि प्रचंड उत्साह , हौस आयुष्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी ती..

आज ना मी ठरवलयं.. अगदी अलवार सोडायचं मनाला.. भटकू दे त्या बिचार्‍याला आज तिच्या आठवणींमधे.. मी नाही येणार आज त्या दोघांच्यामधे… तुम्हीही थोडसं सांभाळून घ्या…

अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायची ना.. तर आठवतयं मला माझी इयत्ता पहिली…आई-बाबा तळमावले नामक एका अतिशय छोट्या खेड्यात प्रॅक्टिस करायचे.. तिथे पाचवीपासून पुढे चांगली शाळा होती पण प्राथमिक शाळा मात्र एवढी चांगली नव्हती… मग माझी ताई आजोळी कल्याणला तर मी माझ्या काकूकडे सातार्‍याला होते.. ते ही फ़क्त छोट्या बालवाडीपासून.. आज जाणवतयं .. आई बाबांची ही केवढी परीक्षा होती ती.. सोपे का होते ते..

तेव्हाची एक आठवण लक्ख आठवतीय.. माझ्या वाढदिवसाला कायम दोन केक असायचे.. घरी केलेले.. एक काकूनी केलेला.. आणि एक आईने करून आणलेला.. कधीही हा नेम चुकवला नाही तिने.. मला खूप भारी वाटायचे.. मैत्रिणींसमोर कॉलर एकदम ताठ असायची कारण कोणाच्याच वाढदिवसाला दोन केक नसायचे.. पण त्यातल्या तिच्या धावपळीचे श्रेय मात्र कधीच तिला बोलून नाही दाखवता आले मला..

मी चौथीत असताना आम्ही सगळे एकत्र आलो.. आई बाबा कराडला शिफ्ट झाले आणि मग मी आणि ताई सुद्धा.. आई अजूनही तळमावल्याला येऊन जाऊन करायची.. पण रविवार मात्र आक्खा घरी.. मग मी सबंध दिवस तिच्या भोवती भोवती असायचे.. तेव्हा पासून मला रविवारचे जे काही आकर्षण आहे ना की बासच… त्या रविवारी काय काय कामं काढायची ती.. देवा रे देवा.. भाजी आणणं.. कपाट आवरणं (अच्छा माझ्या कपाट आवरणे या आवडीचे मूळ यात आहे तर.. आज जाणवले.. ), हिशोब, जादाचे कपडे धूणं, इस्त्री…..अगणित कामांची मालिका तयार असायची कायम तिच्याकडे.. तसा तिने माझा अभ्यास फारसा कधी घेतला नाही.. पण रविवारी कपडे धुता धुता ती गणित प्राविण्यची ती महाअवघड गणित ज्या प्राविण्याने तोंडी सोडवायची की मी थक्क व्हायची..

तिची तिच्या क्षेत्रातील मास्टरी तर मोठी होतीच.. आज ही कित्येक जण तिने केलेल्या अवघड ऑपरेशनच्या आठवणी सांगतातच.. तिचा अचूक औषधे द्यायचा हातखंडा खरचं कौतुकास्पद होता.. पण विषय कोणताही असो.. तिची बुद्धिमत्ता अचाट होती.. कल्याणला शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांमधे तिचे असलेले नाव ही माझीच फार मोठी दौलत वाटते मला..

मी आणि ऋषि (माझा नवरा) शाळेत एकाच वर्गात होतो.. तेव्हा आमच्या चौथीच्या स्कॉलरशिपच्या परिक्षेवेळी ऋषीच्या आई माझ्या आईला भेटल्या होत्या.. एकदाच.. पण अजूनही त्या आठवण काढतात तिची.. इतकं छान वाटतं सांगू..

अफ़ाट होती तिची स्मरणशक्तीसुद्धा.. आमच्या घरातल्या नव्हे ओळखीच्या सुद्धा सगळ्यांचे वाढदिवस हिला कायम तोंडपाठ.. आर्थिक परिस्थिती फार उत्तम होती असेही नाही तेव्हा पण तरीही.. त्या सगळ्यांसाठी ती कायम ग्रिटींग किंवा छोटीशी का होईना पण भेटवस्तू ती आणणारच.. आणि याचं प्लॅनिंग वर्षभर आधी.. दर उन्हळ्याच्या सुट्टीत आम्ही सगळे कल्याणला जायचो.. तेव्हाच ही वर्षभरातल्या सगळ्या वाढदिवसांची सगळी सोय करून ठेवायची.. इतकं उत्तम नियोजन सगळ्याच गोष्टींचं की जणू मॅनेजमेंटचा पण अभ्यासक्रम पुरा केला असावा हिने..

पण ना.. या सगळ्यात एक खंत राहून गेलीय मनात.. का माहित नाही.. “पण तू मला किती आवडतेस अगदी खूप खूप अगदी इत्थ॓॓॓॓॓॓॓पासून ते पार तित्थे.. पर्यंत.. खूप खूप अभिमान वाटतो मला तुझा अगदी अगदी तुझ्यासारखे बनायचेय मला..” हे सांगायचेच राहून गेले तिला..

का नाही सांगितले माहित नाही.. कदाचित लहान होते म्हणून.. की असे काही सांगितले पाहिजे हे उमगलेच नाही म्हणून.. कायम आम्ही हट्ट करत गेलो. ती पुरवत गेली.. पण तिचे पण काही ह्ट्ट असतीलच की… तिचे डोळे मात्र आनंदाने चमकायचे कायम.. माझा शाळेत पहिला नंबर आला की.. वक्तृत्व स्पर्धेत बक्षिस मिळालं की.. माझ्या स्कॉलरशिपच्या सत्कारावेळी.. आणि कधी कधी असेच..उगाचच.. दोन्ही लेकींच्या प्रेमाने.. ती स्निग्धता आजही जशीच्या तशी आठवतेय मला.. किती सोसलं तिने आजारपण.. धैर्याने.. खंबीरपणे.. माहित नाही तिचे सगळे गुण घ्यावेसे तर वाटतात पण हा खंबीरपणा येणे मात्र शक्य नाही वाटत…

वाटतं.. आज असती ती तर.. माझ्या नव्या संसारासाठी काय करू आणि काय नको झालं असतं तिला.. अमाप कौतुक केलं असतं तिने दोन्ही जावयांचं … आजीपण काय हौसेने मिरवले असते.. ताई उगा मला नेहमी म्हणते तू फार लाड करेतस भाचीचे .. पण नातीचे लाड करणार्‍या आजीला मात्र सुखावून पाहिलं असतंच ना.. मनातली सगळी जळमट मग आपसूक तिच्या मायेखाली विरून गेली असती.. कधी आश्वासक शब्दांनी, कधी अबोल नजरेनी तर कधी फ़क्त घट्ट मिठीने प्रश्न सोडवले असते त्याच तिच्या प्रविण्याने.. एक सुंदर अन तृप्त संध्याकाळ अनुभवली असती आई-बाबा दोघांनी एकत्र..

आणि मग मला ही सांगता आले असते कदाचित.. नव्हे नव्हे नक्की.. की किती किती महत्वाची आहेस तू.. हवी आहेस सगळ्यांनाच.. पण आता तुझ्यासाठी ..तुझे हट्ट , तुझी स्वप्न , तुझी माणसं सगळं काही तुझे असेल.. तू म्हणशील तसे असेल सगळे.. तुला हवे तसे.. फ़क्त.. तू फ़क्त एवढा एकच हट्ट ऐक माझा आणि एकदाच परत ये.. ऐकशील ना….

11 views0 comments

Recent Posts

See All

खिडकी

प्रत्येकाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली, जिथे काय जादू असते माहित नाही पण जणू सगळ्या गोष्टी तिथे अगदी...

निरगाठ..

एक एक धागा नकळत उलगडत जातोय…ईकडून तिकडे.. एक एक वीण जुळवण्यासाठी.. कधी प्रवाहाबरोबर..कधी प्रवाहाविरुद्ध.. कधी त्याच्यासारख्या इतर...

コメント


bottom of page