खरं तरं हे सारं फारं पूर्वीच कागदावर उतरायला हवे होते, वाटायचं खूप, पण नाही लिहिलं गेलं हेच खरं
आज ही सुरुवात करायच्या आधी वाटलं खूप सोप्पे आहे, पण आता जाणवतयं की.. इतकं ही सोप्पं नाहीये..
अगदी खरं सांगायचं ना..तरं इतकं महत्वाचं वाटलंच नाही पूर्वी..म्हणजे स्वतः अनुभवायच्या आधी…
ताई नेहमी म्हणायची मला “अगं काय अवीट गोडी असते माहेरची…चार दिवस जरी राहून आलं ना तरी काय भारी वाटतं, ती चार दिवसांची उर्जा मग कित्येक दिवस पुरते..” तेव्हा (माझ्या लग्नाआधी) वाटायचं मला.. काय भंकस करतेय ही..उगाचचं हं .. एवढं छान सासर आहे हिचं.. विनाकारण सेंटी होतेय…
अरेच्चा.. पण मला थोडेच माहित होते..की हे सगळं जसंच्या तस्सं घडणार आहे माझ्याबाबत..
काळ का थांबलायं कुणासाठी.. तो तर तयारचं होता की मला माझे शब्द मागे (नव्हे नव्हे सपशेल मागे) घ्यायला लावायला..
वेगाने गेली चार एक वर्षे.. आणि मग एका शुभदिनी चढलो की आम्ही बोहल्यावर.. आणि मग काय विचारता राव.. अगदी अंतरपाट दूर होतोय नी होतोय तोच जाणीव झाली.. आपल्या अवतीभवतीची माणसं बदलतायतं..
“जरा मिसळू दे तिला तिच्या नव्या नात्यांत ” असं म्हणतं इतका वेळ सतत मागे पुढे असणारी ताई, समाधानाने बघणारी काकू, सगळे सगळेच दुसर्याच गर्दीत विरघळून जातायतं आणि बस्स… त्याक्षणी जाणीव झाली आली ती घटिका आलीच..शब्द मागे घेण्याची.. नुसत्या त्यांच्या दिसण्याने, असण्याने केवढाला आधार वाटतोय.. त्यांच्याच संस्कारांच्या पुंजीवर तर नवी नाती आपलीशी करायची शक्ती येतेय..
आणि मगं ना लगेच ’माझी माहेरची माणसे’ असा एक कप्पा तयार झाला मनात.. की… इतके दिवस माझं आख्ख मनच व्यापलेलं होतं त्यांनी, आता ते त्यांनीच एका कप्प्यात माववून जागा करून दिली माझ्याच नव्या नात्यांना..
आणि मग तो माहेरचा कप्पा शक्तीस्त्रोत बनला माझा.. कधी हळवा तर कधी भक्कम आधार देणारा..
खरं तरं सासर माझं लै गोड.. म्हणजे इतकं की एकवेळ लुटूपुटूचं का होईना पण कधी-मधी भांडू आम्ही बाप-लेक.. पण माझ्या सासूबाई..चुक्कूनसुद्धा लागेल असं तर सोडाचं पण बारीक (बारीक ही हं) वाईट वाटेल असं नाही बोलायच्या..
त्यामुळे ” अस्सं सासर द्वाड बाई..” वगैरे कवितेतही म्हणवत नाही.. पण पण तरीही माहेरची गोडी अवीटच…
तरी खरं माहेरपण मी लग्नाला वर्ष होईल आमच्या आता तरी नव्ह्तचं अनुभवलं … नोकरी नोकरी च की हो कारण ..
काय करणार पापी पेट का सवाल है.. 🙂 🙂 असो पण मागच्या आठवड्यात तो योग आला..मी , ताई आणि माझी लाडकी भाची अशी गॅंग ऑफ गर्लस जमलो कराडला.. चारच दिवस हं पण अहाहा.. काय धमाल केली सांगू…
सकाळी उठायची घाई नाही (तरी ताईच्या मते मी फ़ारच लवकर (साधारण सात ला) उठून आणि पर्यायाने तिलाही उठवून त्रासच दिला.. ), रात्रीपासून डोळ्यासमोर फेर धरणारे डबे नाहीत… आंघोळीची घाई नाही.. की धावत-पळत ऑफिस गाठायची स्पर्धा नाही.. सुख सुख आणि काय असते.. सत्तत बडबड चालू , उगाचच पोट दुखेस्तोवर हसणे, भांडाभांडी आणि अगदी मारामारीसुद्धा.. तानियाचा (भाची माझी) वाढदिवस होता म्हणून डेकोरेशन ची धांदल , बाबांबरोबर मनमुराद गप्पा..
नक्को नक्को संपायला हे दिवस असे वाटत राहिले..
केवढी तरी धमाल, केवढाली मस्ती आणि मनात जपून ठेवावी अशी पुंजी दिली या चार दिवसांनी..
कधी तरी रोजच्या धकाधकीतून इतकं स्ट्रेसफ्री आयुष्य जगायला मिळणं भाग्यचं आहे.. कसलाही ताण नाही, कसलीच गडबड नाही.. मगं भले आम्ही घरं आवरण्यात घालवला असेल एखादा दिवस पण ते ही काम असे वाटलेच नाही..
सोबत गप्पांची मैफिल असली की सगळेचं कसे सुरेल होवून जाते नाही.. रोजच्या रस्त्यावरून जाताना अचानक एक परिचितच वळण नव्याने भेटावे आणि त्याच्या लोभस सौंदर्याने भारून जावे, इतके उत्स्फुर्त इतके सहज की पुढचा सारा प्रवास सुंदर होवून जावा असे हे वळण माझ्या माहेराला कवेत घेणारे.. अलगद मनाला इतके निवांत करणारे की स्ट्रेस-बिस शब्दच पोकळ करून टाकणारे..मायेची उब देवून एक नवी उर्मी निर्माण करणारे..असे माहेर गोड बाई …..
सरते शेवटी मला म्हणावेच लागले ताईला.. ” हो गं बाई.. ही उर्जा कश्शात नाही ग बयो.. दिवस मोजके चार पण केवढी पुंजी…केवढी ती शक्ती.. मानलं ग मानलं..”
ता.क.. परत आलेय तरी.. खरं तरं मनाने अजूनही तिकडेच रेंगाळतेय मी….
सध्या पुर्णपणे माहेरच्या रंगात रंगले आहे.. त्यामुळे आणिही काही पोस्ट याच विषयावर येऊ इच्छितायत…
Comments