Madhura

Apr 19, 20113 min

माझी पहिली-वाहिली भेट– चोर आणि चोरीशी…

कधी कधी ना आपण न बघितलेल्या आणि अगदी दुरान्वयाने सुमद्धा संबंध न आलेल्या गोष्टींची किती भीती बसलेली असते आपल्या मनात.. 

आता चोरी आणि चोर या गोष्टींचा केवढा तरी धसका घेतलेला असतो आपण..

तसं पाहिलं ना तर मे आजपर्यंत मी चोर कधी पाहिला नाही.. पण किस्से चिक्कार ऐकले होते अर्थात दुसर्‍यांकडून.. आणि जो काही धसका घेतला आहे मी या चोर मंडळींचा की विचारायची सोय नाही…

 आता परवाच बघा ना…पाडव्याच्या निमित्ताने आम्ही गेलेलो कराडला ..

३ दिवसांची भरपेट सुट्टी वसूल करून मंगळवारी सकाळी परतलो पुण्याला..

सकाळची महान गडबड आटोपून आणि ३ दिवसांच्या सुट्टीच्या मूडला मागे सारून ऑफिस गाठण्याची घाई सूरू झाली..

डबा, आंघोळी-पांघोळी,पूजा, आवरा-आवरी सगळं एकदाचं उरकलं

आणि आता गाडीला किक मारणार एवढ्यात समोरच्या विंगमधे जाणार्‍या (कदाचित रहाणार्‍या) एका काकांनी हाक मारली..

ते म्हणाले..’अहो, तुम्ही शनिवारी नव्ह्तात का?’

नाही हो.. आम्ही गेलेलो गावाला..पाडवा होता ना.. माझं उत्तर..

त्यावर ते म्हणाले.. हो का?? तुम्हाला माहित आहे का आपल्या बिल्डींगमध्ये चोरी झाली शनिवारी… एक नव्हे तब्बल तीन घरे फोडली…तुमच्या शेजारचा ती मुलं मुलं रहातात ना तो.. आणि पहिल्या मजल्यावरचे दोन्ही…

आता यावर प्रतिक्रिया नव्हे तर प्रतिक्षिप्त क्रिया व्यक्त होणार बहुतेक असे वाटायला लागले मला…

“अग बाई… आमचा फ्लॅट तर तळमजल्यावरच आहे की हो.. आणि आम्ही पण नव्हतोच की… नशिबच म्हणावे लागेल…”

“हो ना… ती मुलं म्हणे ११.३० पर्यंत घरातच होती मॅच पहात.. , मग आपण जिंकलो म्हणून फटाके उडवायला पळाली बाहेर.. तासाभराने परत येऊन पहातायत तर काय दार सताड उघडे.. ”

आता पाचावर धारण बसायची वेळ माझी होती… “अरे बापरे.. काय काय गेलं हो त्यांचं.. ”

 “त्या मुलांचे लॅपटॉप आणि एक बाइक.., वरचे दोन्ही फ़्लॅट्स तर रिकमेच होते.. त्यामुळे काहीच नाही गेलं त्यांचे.. बिचारे चोर.. फ़ुकाची मेहनत झाली. घरं उघडायची… ते असो.. तुम्ही नोकरी करता काय??”

 “हो, ” इति मी

“कोणेती कंपनी ?? कुठे आहे ऑफिस तुमचे.. ? ”

“मी ना (अमुक अमुक) कंपनीमधे आहे.. ऑफिस कल्याणीनगर मधे आहे माझे..” माझे नेहमीप्रमाणे ( हे खास माझ्या नवर्‍याचे मत.. ) पाल्हाळ उत्तर…

” बरेच लांब दिसते.. मग दुपारी नसतं वाटतं कोणी घरात.. ?” काकांच्या चौकश्या..

आता मात्र मी चपापले.. एक तर नुकतेच चोरांबद्दल ऐकलेले.. त्यामुळे एकदम सावध प्रतिक्रिया.. “हो म्हणजे.. तसचं काहिसं .. असो काका मी निघते आता उशीर होतोय..” एवढे बोलून मी निघाले आणि माझ्या मनाचे झोके उंच उंच जाऊ लागले..

 पण फरक इतकाच की ते आता आडवे तिडवे कसे ही चालू होते…

किती प्रश्न.. “असे आलेच कसे चोर.. (कसे म्हणजे काय.. आले.. हा काय प्रश्न आहे??)

किती जण असतील , तीन तीन घर तासभरात फोडली म्हणजे.. किमन ५-६ तरी असतीलच.. (८-१० का असेनात काय फरक पडतो.. )

का आले पण.. (आता मात्र हद्द झाली हं मधुरा तुझी काय ह्याला प्रश्न तरी म्हणता येईल काय )

आमचेच घर कसे काय नाही फोडले.. ( मग काय फोडायला हवे होते?? शर्थ झाली बाई)

या सगळ्या विचारांच्या चक्रात गाडी कशी काय चालवली.. आणि कशी ऑफिसला पोचले मी कळलेच नाही..

 ऑफिसमधे पोचल्याक्षणी हाश्श..हुश्श पण करायच्या पण आधी नवर्‍याला फोन केला.. आणि इति पासून अथ पर्यंत सगळी कहाणी ऐकवून झाली… आणि मग सगळं टेंशन त्याच्या माथी ढकलून मी केलं बाई एकदाचं हाश्श..हुश्श .. काय बरं वाटलं महितेय …

त्यावर नवरा म्हणतो कसा.. अगं चोर बिर ठीक आहे सगळं .. पण.. तुला ज्यानी हे सगळं सांगितलं ते.. काका कोण होते.. ओळखतेस काय तू त्यांना.. आता मात्र मी या गूगली पुढे साफ पायचित..

 हे काही मनातच नव्हते आले माझ्या.. “नाही रे..” माझे अस्पष्ट उत्तर.. “अरे पण ते चोर-बिर नव्ह्ते हं. म्हणजे तसे दिसत नव्हते ते.. चोरांसारखे…” माझी सारवासारव..

“तुला काय ग माहित.. तुझा काय चोर कसे दिसतात , कसे बोलतात याचा अभ्यास आहे की काय…”

 “असं काय रे करतोस.. ते खरचं चोर नव्हते.. त्यांच्याकडे मोबाइल सुद्धा होता.. ” अर्र.. हे काय बोलले किती निरर्थक..आता ऐकावा लागणार आपल्या बुद्धिमत्तेचा उद्धार.. “म्हणजे ते एकदम सज्जन वाटत होते.. आणि सभ्य सुद्धा.. “इति मी..

“अगं पण मग  तुला कशाला विचारले त्यानी की.. दुपारी घरी असता का.. कुठे नोकरी करता.. वगैरे.. वगैरे..”

“अरे शेजारधर्म म्हणून..” माझे अगदीच मिळमिळीत उत्तर.. “मी जाऊ का रे घरी.. काही झाले तर नसेल ना..” चोरी शब्द उच्चारायचे पण धाडस होइना .. खरं तर आता मनात जाम कालवाकालव सुरू झाली.. कुठून जादा महिती पुरवली असे झाले..

 ” नको.. आता संध्याकाळी बघू जे होइल ते होइल.. ” नवर्‍याचे उत्तर…

मनात आले.. किती शंकेखोर झालेय मन आपले.. आजुबाजुच्या घटनांनी धास्तवलोय आपण..का वाटू नये विश्वास समोरच्या माणसांवर.. चांगुलपणा इतका का दुर्मिळ झालाय या जगात..

एक मात्र खरं आक्खा दिवस बैचेन होते मी.. उलटं-सुलट विचारांची नुसती वर्दळ चालू होती मनात..

 एकदाचे साडे सहा वाजले आणि मी तातडीने पळाले ऑफिसमधून..घराचे शाबूत असलेले कुलूप पाहून कसला आनंद झालाय सांगू.. मग मात्र गेलेला आत्मविश्वास परत मिळाल्यासारखे वाटले.. आणि मग काय दुपारची कालवाकालव, डोळ्यात आलेले पाणी , वाटलेली भीती सगळे विसरून गेले मी क्षणार्धात.. जोरदार सरी पडून जाव्यात आणि जमलेली सगळी धूळ साफ़ व्हावी असे काहीसे झाले..

पण एक मात्र नक्की हे जे कोणी चोर होते त्यांनी बरेच काही शिकवले.. आणि मला माझा असा चोरांचा किस्सा मिळवून दिला ते वेगळेच…

    20
    0