Madhura

Mar 19, 20102 min

चाफ्याची फुले

|||||| चाफ्याची फुले ||||||

वर्षा ऋतूतील कुंद संध्याकाळ ,
 

 
दिवसभराच्या वर्दळी नंतर सैलावलेला रस्ता,
 

 
मधूनच तान घेणारा तो लहानगा पक्षी ,
 

 
त्या वळणावर अबोल.. ते दोघे आणि त्यांना सोबत करणारी ते टपोरी चाफ्याची फुले,  तितकीच मुग्ध, अबोल पण सगळ काही बोलून जाणारी !!

तो म्हणतो, तसा, आख्खा दिवस जादूचा होता….
 

 
बाहेर बरसणाऱ्या श्रावणसरी,
 

 
सरींनी आनंदून ओली चिंब झालेली ते नाजुकशी जुई,
 

 
भारावून टाकणारा तो तृप्त मृद्गंध,
 

 
येणाऱ्या सरीमागून सरीमुळे काचेवर होणारा हलकासा आवाज ,
 

 
बाजूच्या चाफ्याच्या फुलांवर जमलेले टपोरे पावसाचे थेंब
 

 
आणि दोघांच्या हातात वाफाळणारी  coffee , आणि सोबत कधीही न संपणाऱ्या गप्पा …  विषयामागून विषयांचे अखंड चाललेले संवाद!!!

एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटावे असे सगळे क्षण एकत्र करून जणू बनला होता तो दिवस…
 

 
एखाद्या चित्रकाराने जणू आपले सगळे कौशल्य पणाला लावून चित्रातील प्रत्येक रेष रेखली , जणू त्यातील प्रत्येक प्रतिमा ही त्या चित्राचाच भाग होण्यासाठी जन्माला आली
 

 
आणि,  त्या चित्रात रंग भरण्याची जबाबदारी मात्र त्या चित्रकाराने त्या दोघांवर देऊन टाकली..
 

 
त्या चित्राचे रंग अधिकाधिक सुंदर करत ते दोघेही त्यात गुंगून गेले , स्वतः बरोबर त्या चित्रातच जणू सामावून गेले..

पण….आता अगदी नको वाटत असतानाही समीप येत चाललेली ती निरोपाची कातरवेळ..
 

 
दोन्ही बाजूनी बहरलेल्या चाफ्याच्या झाडांमधून वळण घेणारा तो निस्तब्ध रस्ता आणि त्यावर मूकपणे चालणारी ती दोघ..,
 

 
मूकपणे एकमेकांना सोबत करणारी!!
 

 
खऱ्या अर्थाने सोबत असण्याचे रहस्य हलकेच उलगडत होत तेव्हा,
 

 
शब्दावाचून संवादाचे उलगडत जाणारे पदर नवे होते दोघांनाही , मौनाची भाषा नवी होती दोघांनाही..
 

 
त्यांच्या या मौनात त्यांना सोबत होती त्या स्निग्ध चाफ्याची, अगदी मूकपणे !!
 

 
पण शब्दांची खरच उरली होती का काही गरज आता ??

“जाणं खरंच इतकं गरजेचं आहे का रे? ” तिचा मूक प्रश्न ,
 

 
“मला तरी कुठे जावसं वाटतंय?” त्याचं मुग्ध निशब्द उत्तर ,
 

 
“मग का जातोयस असा ?” हळव्या मनाचा हळवा पण मनातच गहिवरलेला प्रश्न ,
 

 
तो शांत , स्तब्ध…..
 

 
“इतक्या सुंदर दिवसात आपल्या सोबत असणारी आणि आता अगदी आपल्यासारखीच मूक झालेली चाफ्याची ही फुले तुझ्याचसाठी , तुझ्या ओंजळीत ,
 

 
आपल्या भेटीची आठवण म्हणून” त्याचं हळुवार उत्तर….

आणि मग, जड मनाने वळणारा तो..
 

 
आणि तो दिसेनासा होई पर्यंत त्याला मुग्धपणे पाहणारी ती..
 

 
आणि ओंजळीतील ती चाफ्याची फुले तशीच स्निग्ध …
 

 
फरक होता तो इतकाच,  आता त्या टपोऱ्या चाफ्यावर आता होते,  पावसाच्या थेंबाऐवजी नकळत ओघळलेले तिचे ते टपोरे अश्रुबिंदू…..

    00
    0