Madhura

Mar 23, 20102 min

|||| सखी ||||

|||| सखी ||||

एकदा मला माझ्याच जुन्या डायरीत सापडलं एक पिंपळाच पान !!
 

 
जाळीदार , सुबक आणि एक अनामिक सुगंध असणार…
 

 
सुगंध स्मृतींचा , सुरेल सुवास होता त्याला आठवणींचा ..
 

 
त्या जाळीदार पानाच्या हरेक नक्षीत होती एक आठवण ! कुपीत अत्तर जपावं तशी एक एक साठवण !!
 

 
आठवणी.., काही गोड आणि काही कडू  , काही हसऱ्या तर काही रुसव्याही  !!

अजून आठवतंय मला,
 

 
इवल्याश्या बिलोऱ्या बोलांनी एकत्र गायलेली गाणी,
 

 
चिमुकल्या डोळ्यांनी मिळून पाहिलेली मोठी, मोठी आणि रंगीत स्वप्ने,
 

 
डोलणाऱ्या शुभ्र निशिगांधला पाहून हरखणारी माझी सखी !!
 

 
इटुकल्या-मिटुकल्या  कैरीची फोड माझ्यासाठी घेऊन येणारी माझी जिवलग मैत्रीण !!
 

 
अगदी कट्टी नि बट्टीचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतानाही गट्टी मात्र कधी न सोडणारी !!

खरच इवल्याश्या वयात, मैत्रीचा तत्विकार्थाने अर्थ माहीत  नसूनही कशी जमते अशी प्रगाढ मैत्री? न सुटणार कोडंच नव्हे काय हे?
 

 
का वाढते ती एकत्र वाटून खाल्लेल्या डब्यातल्या प्रत्येक घासाबरोबर?
 

 
का होते अधिकच पक्की चोरून खाल्लेल्या चिंचेच्या आंबट-गोड बुटुकाबरोबर  ?
 

 
खिशातून जपून आणलेल्या चॉकलेटच्या दोन तुकड्यांची चव का बरे  वाढत जाते ते मिळून खाताना?
 

 
मैत्रीला पडतात का हो असे प्रश्न?

आजही सांगावीशी वाटतेच ना?  आवडलेली कविता , भावलेलं गाणं  सखीच्या कानात हळूच..
 

 
आठवावेसे वाटतातच ना  ते सारे क्षण?  ज्यांनी दिला मनाला एक अनमोल ठेवा..
 

 
पावसात भिजत तासनतास गाडीवरून भटकताना, टपरीवरची भाजी भिजत भिजत खाताना
 

 
छोट्याश्या विनोदावर डोळे भरून येईपर्यंत हसताना
 

 
लिहिलेली पहिली कविता हळूच तिला ऐकवताना
 

 
अगदी ऐन थंडीत थंडगार आईस्क्रीम फस्त करताना
 

 
अभ्यासाच्या नावाखाली गप्पांची मैफिल जमवताना
 

 
या सखीची किती रूपे साठत गेली मनात आणि नकळत तीच रुजत गेली माझ्यात !!

मनात खोलवर दडलेलं गुपित हलकेच उलगडतं या सखीसमोर..
 

 
इतकं सहज , इतकं अलगद ..
 

 
पाकळीवरच्या दवबिंदूसारखं , फुलाच्याही नकळत त्याने पाकळीला स्पर्शाव
 

 
तसं..
 

 
सहज जमत तिला माझ्याही नकळत अलगद,
 

 
माझ्याच गुपीताला आपलंस करून घेणं  ..
 

 
अन मग रात्र-रात्र जागवण , रचत स्वप्नांचे मनोरे , कधी तिच्या तर कधी माझ्या स्वप्नांचे
 

 
जणू ती वेगळी नसावीतच कधी…

किती रंग, किती गंध अन किती रूप या मैत्रीची !!
 

 
मनातले मनात राहूनही,  अव्यक्ताचे व्यक्त करू जाणणार्या   माझ्या या सखीची…….

    00
    0