Madhura

Apr 24, 20112 min

सखा..

आज पुन्हा तो आला.. अगदी अवचित काहीही न कळवता..आवेगाने.. अगदी नेहमीप्रमाणे..

तो नेहमीच  असा येतो.. एखाद्या झंझावत्या वार्‍यासारखा आणि मी.. मी मग त्याच्या त्या ओघात अलगद पीसाप्रमाणे वहावत जाते.. तो कायम असचं करतो अगदी कायम ..

कितीदा मी ठरवते.. नाही म्हणजे नाहीच ऐकायचे त्याचं

अगदी बघायचंसुद्धा नाही त्याच्याकडे..

दार घट्ट बंद करून घराच्या उबेत मिटून घ्यायचं स्वतःला..

अगदी कानावर हात ठेवून त्याचा तो मनोहारी गाज रुजूच द्यायचाच नाही मनात…

पण, या असल्या छोट्या छोट्या उपायांनी तो थोडाच मागे फिरणारे..

चांगलाच हट्टी आहे तो आणि हुशारही..

कधी खिडकीतून वाकूल्या दाखवेल..

कधी माझ्या इटुकल्या जाई-जुईंनाच फितूर करेल आणि स्वतःच्या सुगंधाने त्यांनाही गंधीत करेल..

आणि मग हळूच म्हणेल, “अगं जवळपास वर्षाने येतोय मी.. मी नसताना तर माझी आठवण काढतेस.. अगदी डोळ्यात मीच उभा राहीतो झुरत रहातेस..

माझी स्वप्न पण रंगवतेस आणि आज मी आलोय तर हे काय ग नवे… नको ना अशी हिरमसून जाऊ…”

त्याचे ते कृष्णसख्यासारखं रुपडं आणि ते गंधित हास्य मगं हलकेच मला कसे काय मोहवते नेहमी कळतच नाही मला ..

तरीही आज मात्र मी अगदी ठाम.. “आज नाहीच यायचं याच्या लोभस बोलण्यात आज..

खरं तर चांगला आहे तो मनाने..कसा आहे तो ते कदाचित शब्दात नाही येणार बांधता मला..

कारण तो दर वेळी वेगळा आहे.. कधी हळूवार, कधी झेपणार नाही इतका वेगवान..

अगदी जवळ असून कुठल्यातरी दुरत्वाशी नातं टिकवून असलेला..

या क्षणाला अगदी माझा सखा म्हणावा असा पण क्षणार्धात ……..क्षणार्धात  कुठं कोणासं ठाऊक ..

म्हणूनच.. नाही आज नाहीच बोलायची मी त्याच्याशी.. अगदी अगदी वाईट्ट आहे तो.. हेच खरं…

आधी असं अचानक यायचं, भुलवायचं आणि मग नकळत अलवार निघून जायचं

आणि मागे मात्र शिल्लक ठेवायची ती एक जाणीव ..

खास त्याची अशी सगळीकडे भरून ठेवायचं स्वतःचं अस्तित्व त्याचं अन त्याच्या गंधाचं..

आणि मग.. पुन्हा विरह..पुन्हा ते तळमळून वाट पहाणे..

आणि तो ???  तो मात्र येणार त्याला हवे तेव्हा..हवा तसा..

पण.. आज नाही .. नाही म्हणजे मुळीचच नाही..”

पण..पण मनाच्या या सगळ्या खेळात आजही माझ्या लक्षातच आले नाही , माझं ते गॅलरीतून अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे पहात रहाणे..समोरचं चित्र आता धूसर धूसर..डोळे भरून आलेले माझे आणि त्याचेही.. म्हणूनच की काय.. त्याचे ते आर्जव अधिकच तीव्र..

मी नेटाने त्याच्याकडे पाठ फिरवून आले खरी घरात पुन्हा.पण आता मन काही मानेना..मनाला आडवायचे सगळे प्रयत्न केविलवाणे ठरलेले..

जाऊ दे.. नको मन मोडायला त्याचे आणि माझे ही.. अखेर माझी सपशेल माघार..

आणि मग मात्र.. बेबंध, बेधूंद मी धावत आले अंगणात..                        

तो अजूनही कोसळतच होता. त्याच्या गंधाने सगळ्यांच वेडं करतचं होता..आता मी कोसळू दिलं त्याच्या त्या सरींना माझ्यावर..रोमारोमात भिनू दिलं मी त्याला..

आणि हलकेच त्याच्या कानात लटक्या रागाने आकंठ भिजत म्हटले..

” का रे करतोस असा नेहमी नेहमी..आज अगदी ठरवले होते मी नाहीच भिजायचे असे.. नाहीच असे ऐकायचे असे तुझे..

नकोच तुझा तो गंध आणि ती वेडी सर.. पण तू ही दुष्ट आहेस अगदी..बरोबर मला हळवे करतोस..

का रे तुझ्या येण्याने वेड लागते.. इतकी मोठी झाले तरी तू आलास की का पुन्हा लहान व्हावे वाटते..

पण तू मात्र तुला हवा तेव्हा येतोस आणि मला ही अशी बावरी करून टाकतोस ..

पण तू तुझ्या मर्जीचा मालक..हवा तेव्हा येणारा.. जा..

आज जाऊ दे पण उद्यापासून  अगदी कट्टी आहे रे मी तुझ्याशी.. जाम बट्टी नाही हं घेणार.. अगदी कट्टी म्हणजे पक्की कट्टी..  ”

    20
    0